औरंगाबाद :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील (घाटी) यंत्र सामुग्रीची कमतरता तसेच यंत्र सामुग्रीची देखभालीसाठी जिल्हा नियोजन विकास समिती अंतर्गत निधी उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे.
मुंबई येथे आ.सतीश चव्हाण यांनी सुभाष देसाई यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले. आ.सतीश चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (घाटी) औरंगाबाद ही मराठवाड्यातील आरोग्य सेवा पुरविणारी संस्था असून ११७७ खाटा येथे मंजूर आहेत. दरवर्षी बाह्य रूग्ण विभागामध्ये ६ लक्ष रूग्ण तपासणीसाठी येतात. सदर महाविद्यालय व रूग्णालय हे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या अंतर्गत असल्याने सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडून निधी अथवा औषधी पुरवठा केला जात नसल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी निर्दशनास आणून दिले. याठिकाणी नेहमीच औषधी तुटवडा व यंत्र सामुग्रीची कमतरता जाणवते. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील (घाटी) यंत्र सामुग्रीची कमतरता तसेच यंत्र सामुग्रीची देखभालीसाठी जिल्हा नियोजन विकास समिती अंतर्गत रू.तीन कोटी त्र्येपन्न लक्ष इतका निधी उपलब्ध करून द्यावा अशी आमदार सतीश चव्हाण यांनी सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे.